सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे

धनंजय मुंडे

जळगाव ( धरणगाव ) : मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे सेना केवळ घोषणा न करता सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

राज्यात आणि देशात भाजप-शिवसेनेचे सत्तेच्या रुपाने तण निर्माण झाले आहे ते तण बळीराजाच्या नांगराने पूर्णपणे उध्वस्त करुया असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धरणगावच्या जाहीर सभेत केले.या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बळीराजाचे प्रतिक नांगर देण्यात आला.तो नांगर उंचावून बळीराजाला अभिवादन करण्यात आले.याच नांगराचा मुद्दा पकडत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल शेवटचा दिवस असून धरणगावमध्ये १९ वी सभा प्रचंड प्रतिसादात पार पडली.

आमच्या हातात बळी राजाचा नांगर दिलात त्याचं पूजन ताईंने केले आणि आम्ही तो नांगर खांदयावर घेतला आहे.येणाऱ्या काळात या राज्यामध्ये बळीचे राज्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवो अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. त्यांनी सभेत आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये पुन्हा एकदा सरकारचे वाभाडे काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी प्रधानमंत्री नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी घेऊन पळाले त्यातले काही चौकीदाराला मिळाले की काय? म्हणून ते यावर अजून काहीच बोलले नाहीत का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.

हल्लाबोल यात्रेत एक जाणवले की लोक उस्फूर्तपणे सरकारच्या विरोधात आता बोलत आहेत. आमच्या भाषणाचे एक वाक्य पुर्ण होण्याआधी दुसरं वाक्य लोकच बोलत आहेत. इतका प्रचंड विरोध याआधी आम्ही पाहीला नव्हता.भाजप, मोदी आणि त्यांची आश्वासने आता चौकाचौकात चेष्टेचा विषय बनली असल्याचे ते म्हणाले. आज ८४ लिटर पेट्रोल झाले पण आपल्याला महाग वाटत नाही. १९ पैशाने पेट्रोल – डिझेल कमी झाले तरी माध्यमं त्याची ब्रेकिंग न्युज करतात याची त्यांनी खंत व्यक्त केली.

आमची सत्ता आल्यास संजय गांधी निराधार योजनेचे पैसे एकदिवसआधीच देवू – सुप्रिया सुळे

राज्यात सध्या संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी नीटपणे होत नाहीय अशी तक्रार ठिकठिकाणी महिला करत आहेत. मात्र आमचे सरकार असताना ही योजना सुरळीत सुरू होती. आता पुन्हा सत्ता आल्यावर एक दिवस आधीच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळवून देवू असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी धरणगावच्या जाहीर सभेत दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवून घेत होते. आता या चौकीदाराला बदलण्याची वेळ आहे. देशात चोऱ्या होत असताना अशा चौकीदाराचा काय उपयोग.त्यामुळे आता बदलण्याचीनांदी धरणगावातून करुया असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

सेना-भाजप सरकारवर आता बोंडअळी आणा- सुनिल तटकरे

शेतकऱ्यांच्या कापसावर जशी बोंडअळी आली तशी बोंडअळी सेना-भाजप सरकारवर आणा आणि शेतकऱ्यांच्याविरोधात असलेल्या सरकारला खाली खेचा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी धरणगावच्या जाहीर सभेत केले.आमच्या प्रत्येक सभेत जनता उभी राहून या सरकारच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त करताना दिसत आहे.या सरकारने सर्वसामान्य जनतेला नाडलंच शिवाय सरकारी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरीकांच्या तोंडचा घासही पळवला आहे. अशा या फसव्या सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन उभारले असल्याचेही तटकरे म्हणाले.

सभेमध्ये बळीराजाचे प्रतिक असलेल्या नांगराचे पूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले.यावेळी उपस्थित नेत्यांनी बळीराजाचे प्रतिक उंचावून बळीराजाला अभिवादन केले.सभा सुरु असतानाच आदिवासी महिलांनी सुप्रिया सुळे यांना त्यांच्या आदिवासी बांगडया घालायला दिल्या.त्या बांगडया ताईंनी हातात घालूनही पाहिल्या.सभेमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार सतिश पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्थानिक नेत्यांवर आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.सभेच्या सुरुवातीला धरणगाव शहरामध्ये मोटरसायकलची भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीला भव्य असा प्रतिसाद मिळाला.

Previous articleहार्दिक पटेल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
Next articleभाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती मॅग्नेटीक नाही तर पॅथेटीक झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here