सेना-भाजपमधील भांडण म्हणजे बंटी बबलीचा खेळ
खासदार सुप्रिया सुळे
जळगाव ( पाचोरा ) : भाजप आणि शिवसेनेतील खुर्चीची भांडणे म्हणजे बंटी आणि बबलीचा खेळ आहे. यामध्ये बंटी कोण आणि बबली कोण हे तुम्ही ठरवा असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी पाचोराच्या जाहीर सभेत सेना-भाजपला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनातील २० व्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. सेना-भाजपमधील भांडण एखादया नवराबायकोसारखं सुरु आहे. रोज भाजप नावाचा नवरा मारतोय तरीही सेनाबाई काडीमोड घेत नाही फक्त सत्तेवर लाथ मारेन असं बोलत संसार करत आहे अशी टिकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंसारखे पंतप्रधान होवून गेले ज्यांचे नाव जगात नावाजलेले होते. आजच्या पंतप्रधानांना गुगलवर फेकु म्हणून ओळखले जाते. दर्शन नावाच्या एका छोट्या मुलाने गुगलवर फेकू सर्च करुन त्यावर पंतप्रधान मोदींजीचे नाव येत असल्याचे स्टेजवर आणून दाखवले.