लाळखुरकत प्रतिबंधक लस खरेदी निविदा प्रक्रियेतील दोषी मंत्र्यांवर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही
मुंबई : राज्यातील दोन कोटीजनावरांना लाळखुरकत
रोगापासून वाचवणाऱ्या एफएमडी (फूट अँड माउथ डिसीज) लसखरेदी कंत्राटप्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा विषय गेल्या हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावात सर्वप्रथम उपस्थित करणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या ) निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी आश्वासन देऊनही दोषींवर कारवाई झाली नाही, परंतु या प्रकरणातील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आज विधानसभेत लाळ्या खुरकत लसीच्या संबंधी झालेल्या लक्षवेधीचा मुद्दा यापूर्वी डिसेंबर अधिवेशनात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सविस्तर अंतिम आठवडा प्रस्तावात मांडला होता.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते आज राज्यमंत्री यांनी विधानसभेत त्याचा उल्लेख केला मात्र भ्रष्ट्र मंत्री व अधिका-यांना वाचवण्यासाठी ३ महिन्यात अशी कोणतीही चौकशी झाली नाही, लसीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला नाही ज्या बायोवेट कंपनीच्या लसीच्या दर्जाबद्दल देशातुन व राज्यातून तक्रारी होत्या आणि ज्या बायोवेट कंपनीचे ७० लाख डोस देण्याची ऑर्डर लसीचा दर्जा खराब असल्याने हरयाणा सरकारने रद्द केले ती लस महाराष्ट्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न मंत्री पशु संवर्धन हे करत आहेत. त्याच वेळी श्री धनंजय मुंडे यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.
आज हाच विषय पुन्हा विधान सभेत चर्चिल्या गेला.त्यावर सभागृहाबाहेर पत्रकाराना बोलतांना मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कार्यवाही होत नसेल, तर सरकारवर जनतेने विश्वास कसा ठेवायचा. एफएमडी लसखरेदीचं कंत्राट बायोटेक कंपनीला मिळावं यासाठी राज्यातील संबंधीत मंत्र्यांच्या हट्टापायी सात वेळा टेंडरप्रक्रिया राबवण्यात आली. या लांबवलेल्या टेंडरप्रक्रियेमुळे लसखरेदी होऊ शकली नाही. दिड वर्षे जनावरांचं लसीकरण झालं नाही. त्यामुळे तब्बल दोन कोटी जनावरांना लाळखुरकत रोगाचा धोका निर्माण होऊन जनावरे भाकड झाली किंवा त्यांच्या दूधउत्पादनात घट झाली. शेतकऱ्यांचे सुमारे २० हजार कोटींचं नुकसान झाले, अशी माहीती मुंडे यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात दिली होती.
आज विधानसभेत यासंदर्भात झालेल्या चर्चेवेळी सरकारने घेतलेल्या निष्क्रिय भूमिकेबद्दल तसंच दोषी मंत्र्यांवरील कारवाईबाबत मुंडे यांनी संशय व्यक्त केला आहे. सरकार संबंधित दोषी मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसींच्या खरेदीत भ्रष्टाचार करुन कोट्यवधी जनावरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाल्याशिवाय विरोधी पक्ष शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.