राज्यातील बोगस ‘पीएचडी’धारक मंत्री कोण ?
सत्यपाल सिंह यांच्या खळबळजनक वक्तव्याने चर्चेले उधाण
मुंबई : महाराष्ट्र सरकार मधिल एक मंत्री बोगस ‘पीएचडी’धारक असल्याचा खळबळजनक दावा कोणी विरोधकांनी नव्हे तर खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी केला आहे. संबंधित मंत्र्याचे नाव आणि त्याने कोणत्या विद्यापीठातून ही पदवी घेतली ते सांगणार नाही, असे सांगत केंद्रिय राज्यमंत्र्यांनी “सस्पेन्स” निर्माण केला असतानाच हा मंत्री कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आंध्रप्रदेशातील एका शहरात सुरू केलेल्या ‘फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग’ या संस्थेचे उदघाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचे हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते. सिंह म्हणाले, “पीएचडी” या शब्दाचा अर्थही माहिती नसणारे आणि पीएचडी विषयाचे ज्ञान नसतानाही अनेकांनी पीएचडी घेतली आहे. असे सांगतानाच महाराष्ट्रातील एका मंत्र्यानेही अशीच बोगस पीएचडी घेतली असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी करतानाच संबंधित मंत्र्यांनेच मला ही माहिती दिली असल्याचे सांगितले. या मंत्र्याच्या पीएचडीचा विषय सांगायलाही लाज मला लाज वाटते असेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. संबंधित मंत्र्याला ज्या विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली त्या विद्यापीठाच्या विभागप्रमुखांशी संपर्क साधला आणि तुम्ही या विषयावरील पीएचडीला मान्यता दिलीच कशी असा सवालही केल्याचे सिंह यांनी म्हटले. आपल्यावर दबाव असल्यानेच “त्या” मंत्र्याच्या पीएचडीला मान्यता द्यावी लागल्याचे स्पष्टीकरण संबंधीत विभागप्रमुखांनी दिल्याचे सिंह म्हणाले.माझे नावच “सत्यपाल” असल्याने आपण सत्यच बोलतो असा दावाही सिंग यांनी यावेळी केला. खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांनीच केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरु असून,संबंधित बोगस ‘पीएचडी’धारक मंत्री कोण अशा चर्चेले उधाण आले आहे.