आता झेडपी कर्मचा-यांची तीन वर्षानंतर बदली होणार !
विनंती बदलीची ५ वर्ष सेवेची अट रद्द
ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत
परिचर संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नतीत ७५ टक्के कोटा
मुंबई : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची विनंती बदलीची ५ वर्ष सेवेची अट रद्द करुन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर ३ वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर विनंती बदलीस पात्र ठरविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या समस्यांबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचे स्वागत राज्यातील जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांनी केले आहे.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बलराज मगर, उप सचिव गिरीश भालेराव, उप सचिव विजय शिंदे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदांतर्गत काम करणाऱ्या परिचर संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नतीचा कोटा वाढवून तो ७५ टक्के करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस मधील रकमेचा हिशोब देण्याबाबत जिल्हा परिषदांना सुचना देण्यात येणार आहेत. सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जॉब कार्ड देण्याबद्दल सूचना देण्यात येतील. परिचर व वाहन चालक यांच्या गणेवशापोटी रक्कमेत २ हजार ऐवजी अधिक रक्कम देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
परिचर व वाहन चालक यांना गेल्या अनेक वर्षापासून धुलाई भत्ता ५० रुपये दिला जात होता आता त्यामध्ये वाढ, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची विविध पदावरची पदोन्नती, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना घरबांधणी व संगणक अग्रिम आदी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.