केरळच्या धर्तीवर राज्यात अन्न सुरक्षा दल

केरळच्या धर्तीवर राज्यात अन्न सुरक्षा दल

दीपक केसरकर

मुंबई : राज्याचे वित्त व नियोजन व गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी नुकतीच केरळ कृषी विद्यापीठाच्या मनुठ्ठी येथील कृषी संशोधन केंद्राला भेट देऊन विद्यापीठाच्या अन्न सुरक्षा दल (आर्मी) संकल्पना व कृषी उपकरण तंत्रज्ञानातील नव्या संशोधनांची माहिती घेतली. विद्यापीठाने तयार केलेले कृषी तंत्रज्ञानावर आधारित नवीन मॉडेल महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यासाठी विद्यापीठाबरोबर सहकार्य करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

केरळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आर. चंद्राबाबू यांच्याशी केसरकर यांनी चर्चा करून विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध संशोधन कल्पनांची माहिती घेतली. केरळ कृषी विद्यापीठामार्फत अन्न सुरक्षा दल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा दल ही संकल्पना अतिशय उपयुक्त असून त्याचे अनुकरण महाराष्ट्रात करणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. अन्न सुरक्षा दल, कृषी उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र, कृषी यंत्राच्या सेवा व दुरुस्तीसाठीचे मोबाईल युनिट ही नाविन्यपूर्ण मॉडेल असून शेती क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. केवळ अशा अभिनव आणि व्यावहारिक दृष्टिकोनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे शक्य आहे. महाराष्ट्रात प्रथम दोन जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा दल व कृषी यंत्र उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र ही मॉडेल स्वरुपात सुरु करण्यात येतील.

महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात पीक पद्धती वेगवेगळी आहे. कोकणमधील पीकपद्धती ही केरळमधील पिक पद्धतीप्रमाणे आहे. तर मध्य महाराष्ट्रात ऊस व हळद उत्पादन होते तर विदर्भात कापूस व संत्र्यांचे उत्पादन होते. त्यामुळे प्रत्येक विभागानुसार अन्न सुरक्षा दल व कृषी तंत्र सेवा केंद्रांचे काम भिन्न होते. त्यासाठी वेगळे मॉडेल विकसित करण्यासाठी केरळ विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी यासाठी सहकार्य करावे.

केसरकर यांनी केरळच्या विकास अजेंड्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या स्वयंसहायता गटाच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, स्वयंसहायता गटाचे शेती व इतर उत्पादन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्रगत व मागास भागातील सर्व स्तरांना जोडला जाणारा कुटुंबश्री मिशन हे, सक्षमीकरणाचे व उद्योजकतेचे एक उत्तम उदाहरण आहे. अशा संस्था तंत्रज्ञान हस्तांतरणामध्ये मोठी भूमिका बजावत असतात.

कृषी विकासासाठी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर दुसऱ्या राज्यात करण्यास आम्हाला आनंद असून केरळ कृषी विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अन्न सुरक्षा दल, कृषी तंत्रज्ञान सेवा केंद्रे व इतर नाविन्यपूर्ण मॉडेलची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी केरळ विद्यापीठातर्फे सर्व मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. चंद्राबाबू यांनी दिले.

Previous articleबोंडअळी, गारपीट व सोयाबिनची नुकसान भरपाई तात्काळ द्या
Next articleपंकजाताई मुंडे दिव्याज फाउंडेशनच्या वुमन ऑफ वंडर अँचिव्हर्स अवार्डने सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here