काँग्रेसला संपविण्याची भाषा करणा-यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा!
खा. अशोक चव्हाण
लातूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देशात लोकशाही रूजवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र आज सत्तेवर आलेले लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करित आहेत. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ते लातूर येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिरात बोलत होते.
यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. खोटी जाहिरातबाजी, फसवी आश्वासने देण्यापलीकडे सरकारने साडे तीन वर्षात काहीच काम केले नाही. आपल्या पक्षीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा सत्तेत बसलेल्या लोकांचा डाव आहे. भीमा कोरेगावची दंगल याचेच उदाहरण आहे. या दंगलीतला आरोपी संभाजी भिडेला पद्मश्री देण्याची शिफारस राज्य सरकारने कोली होती अशी बातमी वर्तमानपत्रात आली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भिडेला अटक का केली जात नाही, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला. समाजातील सर्वच घटकांत सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांचा आवाज बनून रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संघर्ष करावा असे आवाहन खा. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले.