शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार कोडगे झाले आहे
जयंत पाटील
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला वारंवार सांगूनही हे सरकार कोडगे झाले आहे.शेतकऱ्यांना सरकारने ठोस अशी मदत करावी अशी मागणी करत आहोत परंतु हे गेंडयाच्या कातडीचे बनलेले सरकार याकडे लक्षच दयायला तयार नसल्याचा आरोप विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.
विधानसभेमध्ये आज जयंत पाटील यांनी नियम २९३ अन्वये गारपीटीबाबत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. देशाचे पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आयातीवर निर्बंध घातले जावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मात्र आयात वाढली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या हातात कमी पैसे मिळत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी यांनी केंद्रे खुली केली नाही याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला. तूरला कवडीमोल भाव दिला जात आहे. ५२ टक्के शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गारपीटीने शेतकऱ्यांना झोडपले आहे. आज महागाई वाढली आहे.पेट्रोलचे,डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना त्यापध्दतीने मदत देत नाही. आम्ही शेतकऱ्यांचा विचार करायचो मात्र आताच्या सरकारमध्ये आणि मागच्या सरकारमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे असा टोलाही सरकारला लगावला.
गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातात पाटी देवून पंचनामे करण्यात आले ही पंचनाम्याची पध्दत आहे का ? असा सवाल करतानाच आपल्या राज्यात शेतकऱ्यांशी असा व्यवहार होत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते.शेतकऱ्यांना विशेष पॅकेज दिले पाहिजे, कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार हेक्टरी तर बागायतदार शेतीसाठी ५० हजार हेक्टरी मदत दयावी अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.वीजेचे प्रश्न अजुनही सुटलेला नाही आज तर शेतकऱ्यांना नोटीसीही दिल्या जात आहे. राज्याचे कृषी खाते बेजबाबदारपणे काम करत आहे. हा कृषी खात्याचा अकार्यक्षम कारभाराचा नमुना आहे असेही पाटील म्हणाले.बोंडअळीसंदर्भात अदयापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची मदत मिळालेली नाही. सरकारने बियाणे कंपनीकडून पैसे वसूल करु असे सरकारने सांगितले होते. परंतु पैसे द्यायला कंपन्या वेडया आहेत का ? कंपन्या गेल्या कोर्टात आणि तुम्ही हात वर केले आहेत.
किटकनाशकामुळे ५५ शेतकरी दगावले. ५०० शेतकरी जखमी झाले. त्यांना फक्त ५ हजार मदत दिली. एका शेतकऱ्याने याचिका दाखल केली. त्यामुळे इच्छा नसताना ४ लाख मदत दयावी लागली.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दया आणि शेतकऱ्यांना दुप्पटीने मदत करा अशी मागणीही पाटील यांनी केली.
—