अर्थसंकल्पातून गाजर ही मिळाले नाही
‘राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर’ अर्थसंकल्पातील
१५ हजार कोटींची तूट ४५ हजार कोटींवर जाईल
धनंजय मुंडे
मुंबई : जनतेला सातत्याने गाजर दाखवणा-या सरकारने अर्थसंकल्पातून गाजरही दिले नाही अशी टीका करीत काहीही नाविण्य नसणारा आणि जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात साडे पंधरा हजार कोटींची तूट दाखवली असली तरी कर्जावरील व्याजापोटी द्यावी लागणारी रक्कम आणि सरकारची आर्थिक बेशिस्त लक्षात घेतली तर ही तूट ४५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचेल. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून साडेतीन वर्षांत भाजप-शिवसेनेच्या सरकारनं राज्याला दिवाळखोरीच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले की, जुजबी तरतूद केलेल्या बहुतांश योजना पूर्ण होण्याची मूदत २०२२ ते २०२५ आहे. गेल्या साडेतीन वर्षातली सरकारची कामगिरी पाहीली तर त्या पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. आज उद्योग क्षेत्रात मंदी आहे. कृषीविकास दर घटला आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना समर्पित अर्थसंकल्प सरकारने सादर केला परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात फरक पडला नाही, उलट आत्महत्या वाढल्या.
अर्थसंकल्पात घोषणा होऊनही त्यानुसार निधीची तरतूद होत नाही, तरतूद झालेल्या निधीत कपात केली जाते किंवा तो निधी खर्च होत नाही, याचा परिणाम विकासप्रक्रियेवर होत आहे. गेल्या साडेतीन वर्षात सरकारनं सातत्यानं जनतेची फसवणूक केली असून यंदाही अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. या अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ‘गाजर’ दाखवण्याचं काम केलं आहे, अशी टीकाही मुंडे यांनी केली.