राज्याची आर्थिक शिस्त बिघडवणारा दिशाहीन अर्थसंकल्प !
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. या अर्थसंकल्पातून राज्याच्या प्रगतीचे कोणतेही ठोस धोरण वा राज्यातील जनतेसाठी कोणत्याही प्रभावी योजना पुढे आलेल्या नाहीत. तब्बल १५ हजार कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडून अर्थमंत्र्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. राज्याची आर्थिक शिस्त बिघडवणारा दिशाहीन अर्थसंकल्प, असल्याची प्रतिक्रिया माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील व्यक्त केली आहे.
राज्याच्या आर्थिक विकास वाढीच्या दराचा साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात नाही. शेतीचे उत्पादन का घटले, याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. तरीहीशेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खोटे आश्वासन मात्र दिले गेले आहे. शेतकऱ्यांना खरोखरच दिलासा मिळेल अशा ठोस पावले उचलणाऱ्या योजना अर्थसंकल्पात दिसत नाहीत असे वळसे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, तरुणांना रोजगार मिळेल, असे कोणतेही खरे स्वप्न हा अर्थसंकल्प दाखवत नाही. सर्वात अनपेक्षित म्हणजे, दारिद्र रेषेखालील लोकांना या अर्थसंकल्पात सरकारने स्थानच दिलेले नसल्याकडे वळसे यांनी लक्ष वेधले.