माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना लिलावती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ७४ वय असणारे पतंगराव कदम हे गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होते.
लीलावती रुग्णालयात कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अयशस्वी ठरली. गेल्या आठवड्यापासून पतंगराव कदम यांच्यावर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या दोन दिवसात पतंगराव कदम यांची प्रकृती अधिकच खालावली होती आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी तर आज काॅग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी लिलावतीमध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले कदम राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली होती. पलूस-कडेगाव (पूर्वीचा भिलवडी-वांगी) मतदारसंघातून तब्बल सहा वेळा ते निवडून आले होते.