काॅग्रेसकडून डाॅ.रत्नाकर महाजन की राजीव शुक्लांना उमेदवारी ?
मुंबई : येत्या २३ मार्चला होणा-या राज्यसभेच्या व्दिवार्षिक निवडणूकीसाठी काॅग्रेसकडून प्रदेश प्रवक्ते आणि उपाध्यक्ष डाॅ.रत्नाकर महाजन आणि विद्यमान राज्यसभा सदस्य यांच्या नावाची चर्चा असून, उद्या रविवारी दिल्लीतून काॅग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन उमेदवारांची नावे अंतिम झाली असली तरी काॅग्रेसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. प्रदेश काॅग्रेसने प्रदेश प्रवक्ते आणि उपाध्यक्ष डाॅ.रत्नाकर महाजन, विद्यमान खासदार राजीव शुक्ला आणि माजी केंद्रियमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाची शिफारस केंद्रिय निवड समितीकडे केल्याचे समजते.लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सुशिलकुमार शिंदे हे राज्यसभेसाठी इच्छूक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे डाॅ.रत्नाकर महाजन आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले राजीव शुक्ला या दोघापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सुशिलकुमार शिंदे इच्छूक नसल्याने आ. संजय दत्त यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी लाॅबिंगला सुरूवात केली आहे. काॅग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा आज होणे अपेक्षित होते मात्र काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे आता ही घोषणा उद्या रविवारी होवू शकते. काॅग्रेसचे केंद्रिय सरचिटणीस जनार्दन व्दिवेदी हे उद्या काॅग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार वंदना हेमंत चव्हाण – राष्ट्रवादी,डी. पी. त्रिपाठी – राष्ट्रवादी,रजनी पाटील – काँग्रेस,अनिल देसाई – शिवसेना,राजीव शुक्ला – काँग्रेस,अजयकुमार संचेती – भाजप,राज्यसभेच्या निवडणूकीसाठी ५ मार्चला अधिसूचना जारी करण्यात आली असून, सोमवार दिनांक १२ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.१३ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर; १५ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सहा जागांसाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २३ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे.परंतु सध्या प्रत्येक पक्षाचे संख्याबळ बळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.