भुजबळांच्या उपचारासाठी शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे वाढते वय व त्यांची खालावलेली प्रकृती विचारात घेता त्यांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे.
गेल्या दोन वर्षापासून तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री यांचे वाढते वय आणि खालावलेली प्रकृती पाहता त्यांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. शरद पवार यांनी ८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. भुजबळ हे ओबीसीचे नेते असून,गेल्या ५० वर्षापासून ते समाजकारण आणि राजकारणात आहेत.त्यांनी मुंबईचे महापौर , उपमुख्यमंत्री आणि विविध खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिल्याचे शरद पवार यांनी या पत्रात नमुद केले आहे.भुजबळ यांची सध्याची प्रकृती पाहता त्यांना योग्य ते उपचार देण्यासाठी आपण योग्य ते निर्देश द्याल अशी अपेक्षाही पत्रात केली आहे.मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आ.पंकज भुजबळ यांनाही पाठविण्यात आली आहे. भुजबळांच्या खालावलेल्या प्रकृती संदर्भात मुंडे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करून त्यांना योग्य ते औषधोपचार मिळावेत मागणी केली होती.
छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढत वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे. मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल असेही पत्राच्या शेवटी पवार यांनी म्हटले आहे.