राज्यातील सर्व बसस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार

राज्यातील सर्व बसस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांचे नुतनीकरण करुन त्यामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी तरतूदही उपलब्ध करण्यात आली आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

नियम 92 अन्वये सदस्य अमरसिंह पंडित यांनी मराठवाड्यातील एसटी बसस्थानकांच्या दुरावस्थेबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना रावते म्हणाले, एसटी स्थानकांच्या नुतनीकरणाच्या कामांतर्गत सर्व स्थानके आधुनिक करण्यात येतील. यासाठी नुतनीकरण महामंडळ स्वत: करणार आहे. स्थानकाबरोबरच आजुबाजूच्या परीसराचाही विकास करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी स्थानकावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या असून हे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. सैन्य दलातील सेवानिवृत्ताना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे. एसटी स्थानकातील शौचालय सुयोग्य पद्धतीने करण्याचे काम करण्यात येणार आहे. शिवनेरी, शिवशाही बसेसच्या प्रवाशांकरीता बसण्यासाठीसुद्धा वातानुकूलीत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही स्थानके विमानतळाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. तसेच विमानतळाच्या धर्तीवर वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. यासाठी नकाशेही तयार झाले आहेत. बीड बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम तीन महिन्यात सुरु करण्यात येणार आहे, असेही रावते यांनी यावेळी सांगितले

Previous articleलाठीचार्ज प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर
Next articleराज्यसभेची निवडणूक बिनविरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here