राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण
मुंबई : मनसेच्या उद्या होणा-या गुढीपाडवा मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची पुढील दिशा जाहीर करणार असतानाच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतल्याने या भेटीबद्दल राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत आणि यामुळे या दोन नेत्यांची झालेली जवळीक हा चर्चेचा विषय झाला होता.एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी पवार यांच्या पेडर रोडवरील निवासस्थानी जावून पवार यांची भेट घेवून चर्चा केली.
उद्या शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. याच मेळाव्यात राज ठाकरे हे आपल्या पक्षाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पवारांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमागील कारण गुलदस्त्यात आहे.