अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे कायम
सेविकांना १ हजार ५०० रुपये मानधनवाढ
सेविकांना आता सेवाज्येष्ठतेनुसार मानधन ६ हजार ५०० पेक्षा जास्त
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनि अंगणवाडी सेविका यांच्या निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ करण्यात येणार असल्याची माहिती तसेच १ हजार ५०० रुपयांची मानधनवाढ आणि सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे अंगणवाडी सेविकांना पूर्वी ५ हजार रुपये मानधन होते आता ते ६ हजार ५०० रुपये मिळणार आहे. त्यांना सेवाज्येष्ठतेनुसारही मानधनात वाढ मिळणार आहे. तसेच भाऊबीज दुप्पट करण्यात आली आहे.
संघटनेच्या सुचनेनूसार निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ कायम करण्यात आले आहे. यामध्ये ६० नंतर अंगणवाडी सेविकांची वैद्यकीय तपासणी करण्याची सूचनाही संघटनांनी आणि सेविकांनी केली आहे. त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना ६५ वयापर्यंत सेवेत ठेवण्यात येणार आहे. नवीन रुजू होणा-या अंगणवाडी सेविकांना निव्रुतीचे वय ६० वर्षे असणार आहे, यासाठीही संघटनेच्या पदाधिकारी आणि सेविकांनी मान्यता दिली होती असे त्यांनी सांगितले.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका अशी एकूण २ लाख ७ हजार ९६१ मानधनी कर्मचारी पदे मंजूर आहेत.
या अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित सुरु असून अद्याप काही सेविकांचे बँकखाते आधारशी संलग्न नसल्याने तसेच काहींची बँक खाती इतर लाभ घेत असल्याने जानेवारी २०१८ चे मानधन देण्यात आले नाही. अशा सेविकांना मार्च २०१८ पर्यंत जुन्या पध्दतीने मानधन देण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाने गेल्या ३ वर्षात अंगणवाडी सेविकांना २ हजार ५०० रुपये अशी ऐतिहासीक मानधनवाढ केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.