पालकांनी तक्रार केल्यास खाजगी शाळांमधील भरमसाठ फी विरुध्द निर्णय घेणार
शिक्षणमंत्री विनोद तावडे-
मुंबई : खासगी शाळांकडून भरमसाठ फी आकारण्याचा तक्रारींची दखल घेण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती श्री. व्ही. जी. पळशीकर समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार आता शाळेतील २५ टक्के पालकांनी तक्रार केली तर शुल्क नियंत्रण समिती (एफआरसी) या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत अतुल भातखळकर, अस्लम शेख, आदी सदस्यांनी मुंबईतील काही खाजगी शाळांमधी पालकांनी फी वाढी विरुध्द लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देतांना तावडे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या व्यापारीकरणास शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा व शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) लागू करण्यात आला आहे. मुंबईतील काही खाजगी शाळांमधील फी वाढी विरुध्द केल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित शाळा व्यवस्थापन व पालकांसमवेत एकत्रित बैठक घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शैक्षणिक साहित्यांची खरेदी ही शाळेमधून करण्याबाबत पालकांवर सक्ती करण्यात येऊ याबाबतच्या सूचना व्यवस्थापनास देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ ची अंमलबजावणी १ डिसेंबर, २०१४ पासून संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापनाकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत पालकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने सदर अधिनियमाचा अभ्यास करुन अधिनियमात सुधारणा सुचविण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही.जी.पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे २०१७ च्या शासन निर्णयान्वये समिती स्थापन करण्यात आली. समितीला प्राप्त झालेल्या सूचना , हरकती व समितीसमोर मांडलेल्या सर्व बाबीं विचारात घेऊन समितीने अहवाल शासनास दिनांक ६ डिसेंबर, २०१७ रोजी सादर केला आहे. सदर अहवालात केलेल्या शिफारशींबाबत शासनाकडून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यता येत आहे.