अंगणवाडी सेविकांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षेच ठेवण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून अंगणवाडी सेविकांना आता सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली. नियम ९७ अन्वये झालेल्या अल्पकालीन चर्चेत उत्तर देताना त्या बोलवत होत्या.
मुंडे पुढे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून यापूर्वी २०१४ मध्ये एक हजार रुपये व २०१७ मध्ये एक हजार पाचशे रुपयांनी मानधन वाढविण्यात आले आहे.
तीन वर्षात अडीच हजार रुपयांची भरघोस वाढ मानधनात केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात १२६ कोटी रुपयांची तरतुद केल्याचेही त्यांनी सांगितले. आता सेविकांना साडेसहा हजार रुपये एवढे मानधन पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे. तसेच सेवा ज्येष्टतेनुसार मानधनात वाढही मिळणार आहे.
अंगणवाडी सेविकांच्या सूचनेनुसारच सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ वर्ष कायम करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. यामध्ये ६० वर्षे वयासनंतर सेविकांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना ६५ वर्षे वयार्पंत सेवेत ठेवण्यात येणार आहे. नवीन रुजू होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तीचे वय ६० वर्षे असणार आहे.
कुपोषणात राज्याने चांगले काम केले आहे. यात अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे. सुमारे दोन लाख सेविकांच्या माध्यमातून ३६ लाख कुपोषित बालके, स्तनदा माता आणि कुमारिका यांच्यापर्यंत पोषक आहार पोहविण्यात येतो.
कुपोषण निर्मुलनासाठी अंगणवाडी सेविकांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा आहेत. पोषण आहार वेळच्या वेळी बालकांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने राज्यातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावू शकेल, असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित असून, काही सेविकांचे बँक खाते आधारशी संलग्न नसल्याने जानेवारी २०१८ चे मानधन देण्यात आले नाही. अशा सेविकांना मार्च २०१८ पर्यंत जुन्या पद्धतीने मानधन देण्यास परवानगी देण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.