काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे युती ही अफवाच
संजय निरुपम
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची युती होणार आहे.अशी चर्चा काही दिवसांपासून पासून सुरु असून, काँग्रेस मनसेशी कधीच युती करणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची युती होणार हि फक्त अफवा आहे. असे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज पत्रकार परिषदेत दिले . काँग्रेस नेहमी समविचारी पक्षाशी युती करते आणि मनसे हा कोणताही विचार नसलेला पक्ष आहे. भविष्यात आमचे असले कोणतेही गठबंधन होणार नाही असे ते म्हणाले
महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा फक्त समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आला आहे. मनसे जातीयवाद निर्माण करत आहे. मनसे भारतीय संविधानाचा आदर करत नाही. मनसे जाती, भाषा,प्रांत, धर्म यामध्ये कायम भेदभाव करत आलेला आहे. अशा पक्षाशी काँग्रेस कधीच युती करणार नाही. काँग्रेस जाती, भाषा, प्रांत, धर्म यामध्ये भेदभाव मानत नाही. काँग्रेससाठी सर्व एक समान आहेत.आणि काँग्रेस नेहमीच सर्व जाती आणि धर्माचा आदर करत आलेली आहे.असे निरुपम यांनी सांगितले
निरुपम पुढे म्हणाले की मनसेने याआधी उत्तर भारतीयांना मारझोड केली. उत्तर भारतीय रिक्षा व टॅक्सीवाले यांना भयंकर त्रास दिला आणि आत्ता गुजरातो समाजाला मनसे त्रास देत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली येथे दुकानांवरील पाट्यांची तोडफोड केली. कारण त्या पाट्या गुजराती मध्ये होत्या. मनसेच्या या गुंडागर्दीचा मी निषेध करतो. मनसेचा हा मार्ग चुकीचा आहे. याचा मी विरोध करत आहे. मुंबईतील सर्व वर्गांना सरंक्षण मिळाले पाहिजे आणि हि सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून हा सगळा प्रकार ताबडतोब थांबवावा.असे आवाहन निरुपम यांनी केले.
मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे. काँग्रेस मराठी पाट्यांच्या विरोधात नाही आहे. दुकानावरील पाट्या इंग्रजी, मराठी आणि हिंदीतून असाव्यात असा खूप जुना कायदाच आहे. परंतु कोणी अन्य कोणत्या भाषेत पाटी लावत असेल तर मुंबई महानगरपालिका आणि शासन त्यावर कारवाई करेल. शासनामध्ये शिवसेना आणि भाजपचेच सरकार आहे, त्यांनी कारवाई करावी. हि सरकारची जबाबदारी आहे. मनसेला हा अधिकार कोणी दिला, असा सवाल निरुपम यांनी यावेळी उपस्थित केला
संजय निरुपम पुढे म्हणाले की मोदीमुक्त भारत आम्हालाही पाहिजे आहे. आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारांचा विरोध करतो. नरेंद्र मोदींवर सर्व वर्ग, सर्व समाज नाराज आहेत. येत्या निवडणुकीत भारतीय जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नको आहेत. नरेंद्र मोदी हे गुजराथी आहेत म्हणून संपूर्ण गुजराथी समाजाला त्रास देणे हे चुकीचे आहे. याचा मी निषेध करतो. भविष्यात मोदिमुक्त भारत नक्की होणार आहे. काँग्रेस शिवसेना, मनसे आणि भाजपा यांच्याशी कधीच गठबंधन करणार नाही, असे त्यांनी शेवटी आवर्जून नमूद केले.