अबब…मंत्रालयात एका आठवड्यात मारले ३ लाख उंदीर
मुंबई : सरकारवर शरसंधान करण्याची एकही संधी न सोडणारे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात एका आठवड्यात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचे सांगत सभागृहात एकच हलकल्लोळ उडवून दिला. जिथे महापालिकेला सहा लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात तिथे सात दिवसांत या संस्थेने हा पराक्रम कसा साधला, एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात १० मांजरी सोडल्या असत्या तरी झाले असते असा सवाल करीत हे उंदीर मारण्याचे विष धर्मा पाटलांच्या हाती लागल्याने त्यांनी आत्महत्या केली असा दावाही खडसे यांनी यावेळी बोलताना केला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या सामान्य प्रशासन विभागावर शरसंधान करीत हा मोठा गैरव्यवहार असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही खडसे यांनी यावेळी बोलताना केली.
एकनाथ खडसे यांनी केलेला उंदीर घोटाळा आज सभागृहात गाजला.अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या चर्चेदरम्यान बोलताना खडसे यांनी हा आरोप केला. खडसे म्हणाले, एका संस्थेला मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम २०१६ साली देण्यात आले. या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचे आढळले. गलेलठ्ठ उंदीर, किरकोळ उंदीर, पांढरे, काळे उंदीर अशी वर्गवारीच या संस्थेने केली. महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यांचे हे काम या संस्थेने सात दिवसांतच पूर्ण केल्याचे दाखवले आहे.या संस्थेने प्रत्येक दिवसाला ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारल्याचे म्हटले आहे. यातील .५७ म्हणजे नवीन जन्मलेले उंदीर असावेत. मिनिटाला ३१.६८ उंदीर मारले. दररोज मारलेल्या या उंदरांचे वजन ९,१२५.७१ किलो म्हणजे ९ टन होते. दररोज एक टन उंदीर ट्रकमधून घेऊन गेले. पण त्यांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे लावली याचा कोणताही अहवाल सरकारकडे उपलब्ध नाही, असे खडसे म्हणाले.
धर्मा पाटलांकडे हेच विष
याच दरम्यान मंत्रालयात आलेले धर्मा पाटील यांच्या हाती हे वीष लागले आणि त्यांनी आत्महत्या केली, असे खडसे यांनी सांगताच सभागृह अवाक झाले. हे वीष बाळगण्यासाठी लागणारी परवानगी या संस्थेने सामान्य प्रशासन किंवा गृह विभागाकडून घेतलेली नाही. तसेच वीष हाताळण्याचा परवानाही या संस्थेकडे नव्हता, असे सांगत या संस्थेने महापालिकेला दोन वर्षांत न साधता आलेले दिव्य सात दिवसांत कसे साधले असा सवाल केला. एवढे करण्यापेक्षा मंत्रालयात १० मांजरी सोडल्या असत्या तरी झाले असते, अशी कोपरखळी त्यांनी मारली.एकट्या मंत्रालयात जर तीन लाख १९ हजार ४०० उंदीर असतील तर राज्य सरकारच्या राजभरातील सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि महामंडळांत किती उंदीर असतील, असे विचारत एकनाथ खडसे यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण गंभीर असून अशा प्रकरणांमुळे सरकार बदनाम झाले असल्याचे खडसे म्हणाले.