संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज मुंबईत “एल्गार” मोर्चा
मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असणारे संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी आज आझाद मैदानावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिपचे कार्यकर्ते विधान भवनावर धडकणार देणार आहेत.
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज दुपारी १२ वाजता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ सर्व कार्यकर्ते जमायला सुरूवात झाली आहे तर आझाद मैदानही कार्यकर्त्यांनी भरू लागले आहे.
कोरेगाव भिमा प्रकरणी पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांना अटक केली आहे मात्र संभाजी भिडे यांना अटक झालेली नाही. संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी. अन्यथा २६ मार्चलाच मुंबईत मोर्चा काढू असाही इशारा आंबेडकर यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर अजूनही संभाजी भिडे यांना अटक झालेली नाही. त्यामुळे आज दुपारी १२ वाजता मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईत पोहोचले आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.