मुख्यमंत्र्यांची भेट रद्द करून उध्दव ठाकरे मातोश्रीवर परतले
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांच्या विकास निधीसंदर्भात आज विधानभवनात येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार होते. परंतु विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराला वेळ लागल्याने अडीच तास वाट पाहुन उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट न घेता थेट ‘मातोश्री’वर परत जाणे पसंद केले. मात्र मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यातील भेटीची कुणकुण लागल्यानेच उद्धव ठाकरे यांनी भेट रद्द केल्याची चर्चा विधानभवन परिसरात होती.
शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा विकास निधी मिळत नसल्याने याबाबत शिवसेनेच्या आमदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेवून चर्चा करणार होते. प्रथम या दोन नेत्यांची भेट ५ वाजता होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु याच वेळी विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराला उशीर होत असल्याने ही भेट तासाभराने पुढे ढकलण्यात आली. याच वेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे मंत्री , खासदार आणि आमदार स्वागतासाठी सज्ज होते.त्याच वेळी राज्यसभा सदस्य नारायण राणे यांचे विधानभवनात आगमन झाले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची वाट पहात नारायण राणे यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक मांडली. त्याच वेळी मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्या भेटीची वेळ पुढे ढकलण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराला उशीर होत असल्याने उद्धव ठाकरेनी ही भेट रद्द करीत मातोश्रीकडे प्रयान केले. याची खबर मिळताच मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. आणि नियोजित बैठक रद्द झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. लवकरच पुढील बैठक घेवू असेही सांगितले. मात्र मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यातील भेटीची कुणकुण लागल्यानेच उद्धव ठाकरे यांनी भेट रद्द केल्याची चर्चा विधानभवन परिसरात होती.