मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांचा दुबईत मृत्यु झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी पद्मश्री असल्याकारणाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेल्याची बाब स्पष्ट झाली आहे. २२ जून २०१२ ते २६ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रात ४० व्यक्तीवर अश्याप्रकारे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे शासकीय इतमामात श्रीदेवी यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्कार आणि याबाबत ज्यास अधिकार आहेत त्याची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री प्रमुख असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार खात्याने अनिल गलगली दिलेल्या माहितीत कळविले की शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. दिवंगत अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याबाबत दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मौखिक निर्देश प्राप्त झाल्यानुसार दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ च्या शासन पत्रानुसार कार्यवाही करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांस कळविण्यात आले. या माहितीची विचारणा करण्याच्या प्रयोजनाबाबत अनिल गलगली यांस विचारणा केली असता गलगली म्हणाले की ‘ श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर जेव्हा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा सांगितले जात होते की ज्यांस पद्मश्री दिली जाते त्या व्यक्तीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात, याची पुष्टी करण्यासाठी माहिती विचारली होती पण यात पद्मश्री असल्याने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतात याची पुष्टी झाली नाही उलट हे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची नवीन माहिती समोर आली आहे.
दिनांक २२ जून, २०१२ ते दिनांक २६ मार्च, २०१८ पर्यंत एकूण ४० मान्यवरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये श्रीदेवी यांच्या व्यतिरिक्त श्रीमती मृणाल गोरे- माजी खासदार,विलासराव देशमुख- माजी केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री, प्रभाकर कुंटे- माजी मंत्री , कृष्णराव देसाई ऊर्फ बाबासाहेब कुपेकर- माजी विधानसभा अध्यक्ष , शंकरराव देवराम काळे- माजी राज्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे- शिवसेना प्रमुख, लक्ष्मण रंगनाथ हातणकर- माजी राज्यमंत्री, शंकरराव जगताप- माजी विधानसभा अध्यक्ष, दिनकर बाळू पाटील- माजी खासदार, सहकार महर्षी छत्रपाल उर्फ बाबासाहेब आनंदराव केदार- माजी राज्यमंत्री, रजनी रॉय- माजी नायब राज्यपाल, पाँडेचरी, सत्यनारायण गोएंका- विपश्यना गुरुजी, मोहन धारिया- माजी केंद्रीय मंत्री, सुभाष झनक- माजी मंत्री , सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन- बोहरा धर्मगुरु, दत्तात्रय नारायण पाटील- माजी आमदार , अ.र.अंतुले- केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री, आर.आर. पाटील- माजी उप मुख्यमंत्री, गोविंदराव वामनराव आदिक- माजी मंत्री, , डॉ. सय्यद अहमद, राज्यपाल- मणिपूर , रामभाऊ कापसे-अंदमान व निकोबारचे माजी नायब राज्यपाल , मदन विश्वनाथ पाटील- माजी कॅबिनेट मंत्री, प्रमोदबाबू भाऊरावजी शेंडे- माजी विधानसभा उपाध्यक्ष, शरद जोशी- माजी खासदार व शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष, मंगेश पाडगावकर- ज्येष्ठ कवीवर्य , डॉ.दौलतराव आहेर- माजी आरोग्यमंत्री , डॉ. भवरलाल जैन- जैन इरिगेशन समूहाचे संस्थापक, निहाल मौलवी मो. उस्मान अहमद- माजी मंत्री , निवृत्त नामदेव ऊर्फ बापूसाहेब थिटे-माजी खासदार व राज्याचे गृह राज्यमंत्री, बाबूराव महादेव भारस्कर- माजी समाजकल्याण मंत्री, मनोहर ऊर्फ बाबासाहेब गोपले- मातंग समाजाचे नेते, श्रीमती जयवंतीबेन मेहता- माजी केंद्रीय राज्यमंत्री, मधुकरराव किंमतकर- माजी अर्थ राज्यमंत्री, वसंत डावखरे -विधानपरिषदेचे माजी सभापती , प्रा. नारायण सदाशिव फरांदे- विधानपरिषदेचे माजी सभापती, ॲड. चिंतामण वनगा- लोकसभा सदस्य , मुझफ्फर हुसेन- ज्येष्ठ पत्रकार , डॉ. बी. के. गोयल- पद्मविभूषण आणि डॉ. पतंगराव कदम- माजी मंत्री यांचा समावेश आहे.