नवसाने मुल झालं आणि मुके घेवून मारलं अशी परिस्थिती सरकारची
धनंजय मुंडे
मुंबई : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार केला. पंकजा मुंडे यांनी लहान मुलांच्या चिक्कीत घोटाळा केला. आमच्या मराठवाडयात एक म्हण आहे नवसाने मुल झालं आणि मुके घेवून मारलं अशी परिस्थिती या सरकारची होवू नये असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.
काल आम्ही अंबाबाईचा रथ ओढला आणि अंबाबाईला राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो असं साकडं घातल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.काल देशभरात एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फुल होत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली
ललित मोदी पैसे घेवून पळाले, मल्ल्या पैसे घेवून पळाला, नीरव मोदी पैसे घेवून पळाला. असेच जर हे लोक पळू लागले तर १५ लाख खात्यात यायचे सोडा आपल्यावरच कर्ज होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई, वाढते गुन्हे यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगून आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि मंत्रालयात उंदर आहेत असा टोलाही लगावला. मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारवर चौफेर टिका करतानाच सभेमध्ये जान आणली.