माझ्या मंत्रिपदाचा प्रत्येक क्षण परळीच्या विकासासाठीच 

माझ्या मंत्रिपदाचा प्रत्येक क्षण परळीच्या विकासासाठीच 

ना.पंकजाताई मुंडे

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या भागाच्या सर्वांगिण विकासाचे सातत्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. आजची विकासयात्रा ही त्याच्याचसाठी आहे. माझा वेळ व मंत्री पदाचा प्रत्येक क्षण हा परळीचा विकासासाठीच मी सध्या खर्च करत आहे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले

ना. पंकजाताई मुंडे यांच्या गांव तिथे विकास दौ-याला आज खोडवा सावरगांव येथून सुरवात झाली, त्यावेळी विविध गावांत ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, रासप नेते रत्नाकर गुट्टे, ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, प्रा. बिभीषण फड, माधव दहिफळे, सरपंच उर्मिला दहिफळे, रेखा दहिफळे,विनायक गुट्टे, बाळू गुट्टे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, निवडणुका या पैशाच्या किंवा गुंडगिरीच्या जोरावर जिंकता येत नाहीत, त्यासाठी लोकांचा विश्वास आणि प्रेमाची भावना महत्वाची असते. मला विश्वास आहे की, तुमची भावना आणि विश्वास माझ्यावर आहे. कदाचित माझी आणि तुमची भेट कमी होत असेल पण एकही दिवस असा नाही की तुमचा विचार माझ्या मनात आला नाही. तुमच्या प्रेमाची परतफेड या भागाचा विकास करूनच होणार आहे त्यामुळे मंत्री पदाचा प्रत्येक क्षण परळीच्या विकासासाठीच खर्च करत असल्याचे त्या म्हणाल्या.

परळी मतदारसंघातील प्रत्येक गांव काही दिवसात हायमास्ट दिव्यांनी उजळणार आहे. त्यासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे योजना मी अंमलात आणली आहे. या विकास दौऱ्यात मी एकटी आले नाही तर माझ्या सोबत प्रशासनातील अधिकारी सोबत आणले आहेत.त्यामुळे तुमचे कोणतेही काम राहणार नाही.ग्रामविकास, जलसंपदा, जलयुक्त शिवार, रस्ते, महामार्ग सारख्या महत्वाकांक्षी योजना आपल्या दारी आणल्या आहेत.मोठया प्रमाणावर कर्जमाफी झाली आहे. असे सांगत परळी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून या भागाची विकासाची भूक भागवणार आहे असल्याचे त्या म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर आपण खूप प्रेम केले आहे. त्यांचे नेतृत्व तुम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. त्यांनी या भागाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी असून त्यादृष्टीने मी प्रयत्न करत आहे. माझा विकास हा गावातील एकट्या पुरता मर्यादित नाही तर शेतकरी, तरूण बांधव, महिला, वंचित घटकांसाठी आहे. एकही गांव मी विकासापासून वंचित ठेवणार नाही. तुमची साथ मला सदैव मिळाली आहे त्यामुळे तुमच्या रूपाने खुद्द मुंडे साहेब मला आशीर्वाद देत असतात असे नेहमी वाटते, हीच शक्ती माझ्यासाठी महत्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.

अनेक कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

ना. पंकजाताई मुंडे यांनी आज खोडवा सावरगांव सह दैठणा घाट, गुट्टेवाडी, हाळम, हेळम, भोजनकवाडी, धर्मापूरी, नंदागौळ आदी गावांना भेटी देऊन कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण केले. ना पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी प्रत्येक गावांना हायमास्ट दिवे व शुध्द पाण्यासाठी आरओ यंत्रणा मंजूर केली आहे. ग्रामविकास, बांधकाम विभाग, जलसंधारण, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, महिला बचतगट, शेतकरी कर्जमाफी आदी विविध योजनेच्या माध्यमातून मंजूर व झालेल्या कामांचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला.

क्षणचित्र
————
• दौ-यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास रथातून ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रत्येक गावांत प्रवेश केला. हा रथ सर्वाचे आकर्षण ठरला.
• खोडवा सावरगांव येथून जात असताना
गावच्या बाहेर एक आजी ना. पंकजाताई मुंडे यांची वाट पहात उन्हात उभ्या होत्या. मुंडे साहेब खोडवा सावरगांव येथे आल्यास त्यांच्या घरी आवर्जून जात असत. ना. पंकजाताई यांनी देखील वाहनांचा ताफा थांबवून त्यांची आस्थेने विचारपूस करताच आजींच्या आनंदाला पारावार राहिला नाही
• या दौ-यात प्रत्येक ठिकाणी ना. पंकजाताई मुंडे यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले.
• गुट्टेवाडी येथे महिला बचतगटांनी
ना. पंकजाताई मुंडे यांना ‘गोपीनाथ मुंडे’ असे नांव असलेली सोन्याची अंगठी भेट देऊन आपल्या लाडक्या लेकीचा प्रेमाने सत्कारहि केला. ग्रामस्थांचे प्रेम पाहून पंकजाताई भारावून गेल्या.
• तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेसह जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, कृषी, आरोग्य, वीज वितरण आदी खात्याचे अधिकारी दौ-यात सहभागी झाल्याने शासन आपल्या दारी चा प्रत्यय येत होता.

Previous articleनवसाने मुल झालं आणि मुके घेवून मारलं अशी परिस्थिती सरकारची
Next article१ मे २०१८ पर्यंत एस.टी. कामगारांचा वेतन करार करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here