भाजपच्या मेळाव्यासाठी २८ विशेष रेल्वे गाड्या, ५० हजार बसेस आणि जीपची व्यवस्था
मुंबई दि. ४ विराट महागर्जना रॅली नंतर स्थापना दिनानिमित्त साधून भाजप मुंबईत पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. उद्या होणा-या भव्य मेळाव्यासाठी राज्यभरातुन सुमारे तीन ते चार लाख कार्यकर्ते या मेळाव्याला हजेरी लावणार असून, या मेळाव्यासाठी २८ विशेष रेल्वे गाड्यासोबतच ५० हजार बसेस आणि जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाचा स्थापना दिवस असल्याने भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित होणा-या मेळाव्याला मित्र पक्षाबरोबरच सध्या भाजपाकडून राज्यसभेवर गेलेल्या नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आमंत्रण देण्यात आलेले नाही.
मुंबईत पहिल्यांदाच भाजपच्या स्थापना दिनानिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील गावातल्या शेवटच्या कार्यकर्ता या मेळाव्याला उपस्थित राहणार असून, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रियमंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल गडकरी तसेच पक्षाचे राज्यातील केंद्रीय मंत्री, प्रभारी, सहप्रभारी उपस्थित राहणार आहेत.या महा मेळाव्याला सुमारे ३ ते ४ लाख कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यासाठी राज्यभर तसेच मुंबईत वातावरण निर्मिती करण्यात येवून या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी २८ विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आल्या आहेत. या शिवाय ५० हजार बसेस आणि जीपचीही व्यवस्था करण्यात आली आहे. २०१४ ला मुंबईत विराट महागर्जना रॅली पार पडली होती. या रॅलीनंतर मोठे परिवर्तन घडले होते. भारतीय जनता पार्टीच्या ६ एप्रिल रोजी होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या मेळाव्यानंतर कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून देतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.
मेळाव्याच्या ठिकाणी तीन लाख कार्यकर्ते बसतील एवढा भव्य मंडप, प्रमुख मार्गदर्शक यांच्या व्यासपीठाच्या व्यतिरिक्त आमदार, खासदारांसाठी आणि पदाधिकाऱ्यासाठी दुसरे व्यासपीठ केले आहे. महिलांना थांबण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कुर्ला, बांद्रा, सीएसटी, लोकमान्य टिळक टर्मीनस या ठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार असून तेथून कार्यकर्त्यांना सभास्थळी नेआण करण्याची व्यवस्था केली आहे.महामेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गुरुवारी सायंकाळी मुंबईत आगमन होईल. विमानतळापासून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत युवामोर्चाचे कार्यकर्ते बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत करणार आहेत. महामेळाव्यास संबोधित केल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक होणार आहे.या मेळाव्याला कुठल्याही मित्रपक्षाला आमंत्रित करण्यात आले नाही. राज्यसभा सदस्य नारायण राणे यांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते एनडीएचे घटक पक्ष आहेत. ते भाजपमध्ये नाहीत त्यामुळे त्यांना आमंत्रित केलेले नाही.