धनंजय राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ – अजित पवार
सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे आणि ऊसतोड मजुरांचीही फसवणूक केली ; धनंजय मुंडेंनी साधला ऊसतोड मजुरांशी संवाद
सांगली : राज्य सरकारने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी , महिला, युवक, व्यापारी, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाची तर फसवणूक केलीच त्याही पेक्षा वाईट म्हणजे ज्यांच्या कष्टामुळे पक्षाला चांगले दिवस आले त्या स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि लाखो ऊसतोड मजुरांचीही फसवणूक केली अशी खंत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर धनंजय हा राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ असल्याचे गौरोदगार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू असलेली हल्लाबोल यात्रा आज सांगली जिल्ह्यात आली असता कुंडल येथील क्रांतिवीर जे.डी. बापु लाड सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस तोडणी साठी आलेल्या बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोडणी कामगारांनी काम बंद ठेवत मुंडे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने कारखाना परिसरात झालेल्या कार्यक्रमात मुंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
जो समाज, उसतोड मजूर स्व. मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर भाजपाच्या पाठीशी राहिले त्या स्व. मुंडे साहेबांच्या नावे या सरकारने ऊसतोड कामगार महामंडळ जाहीर केले मात्र सुरू केले नाही , त्याचे कार्यालय सुरू केले नाही एकाही मजुराला त्याचा लाभ नाही हा स्व. मुंडे साहेब आणि तूमचा अपमान असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. महामंडळ राहू द्या जाहीर केले स्मारक तरी केले का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अलीकडच्या काळात धनंजय मुंडे हे आपल्या कामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुख मैदानी तोफ झाली असल्याचे गौरोदगार यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काढले त्याचा संदर्भ घेत ही संधी एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील मुलाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यामुळे मिळाल्याचे सांगून आपण आपल्या ऊसतोड मजूर बांधवांसाठी संघर्ष करू त्यांनीही आपल्याला साथ द्यावी असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
स्व. आर.आर. पाटील यांच्या तासगाव येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेत धनंजय मुंडे यांचे आगमन होताच युवकांनी व उपस्थितांनी वाघ आला रे वाघ आला, राष्ट्रवादीचा वाघ आला अशा घोषणा दिल्या. त्यावेळी जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू होते, त्यांनी याचा संदर्भ घेत हो वाघ ऊस्मानाबाद आणि जळगावच्या सभा करून आला असल्याचे सांगितले त्यालाही उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला.