भाजपच्या महामेळाव्याने दसरा आणि गुढीपाडवा मेळाव्याचे विक्रम मोडीत निघणार !
मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरील दसरा आणि पाडवा मेळाव्याचे गर्दीचे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.
शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजपने या मेळाव्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. ११ वाजता सुरू होणा-या या मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदान खचाखच भरले आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ५ लाख भाजप कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काल रात्रीपासूनच भाजपाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.भाजपाने कार्यकर्त्यांसाठी २७ विशेष रेल्वे गाड्या आरक्षित केल्या आहेत. तर ५० हजारांहून अधिक बसमधून कार्यकर्ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाहून बीकेसीत दाखल होत आहेत. या महामेळाव्यामुळे बीकेसीकडे येणा-या सर्व रस्त्यांवर वाहतूककोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहे. आजच्या मेळाव्याच्यानिमित्ताने शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याच्या गर्दीचे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.