पवारसाहेब… चहावाल्याच्या नादी लागू नका
मुंबई : पवार साहेब… चहावाल्याच्या नादी लागू नका. नाही तर पुन्हा एकदा धूळधाण होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समाचार घेतला.बीकेसी येथे पार पडलेल्या भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री कार्यालयात होणा-या चहापान खर्चावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लक्ष केले होते. पवार यांच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज महामेळाव्यात बोलताना उत्तर दिले.’आम्ही चहा पित असल्याने आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच पाजतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.पवार साहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. गेल्या निवडणूकीत उडालेली धूळधाण लक्षात ठेवा असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचाही समाचार घेतला. राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल यात्रा काढत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. एकमेकांविरोधात लढलेले अनेक जण सध्या आता एकत्र येत आहेत. शिकार दिसल्यावर लांडगे एकत्र येतात.त्या प्रमाणे आता सत्ता दिसल्यावर लांडगे एकत्र येऊ लागले आहेत अशी टिका विरोधकांवर करतानाच आमचा पक्ष हा सिंहांचा आहे. आम्ही लांडग्यांना घाबरत नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. मुख्यमंत्री वर्गाच्या मॉनिटरसारखे आहेत. अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. माझा वर्ग रिकामा नाही. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, अशी माझी स्थिती नाही’, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.