धो..धो.. पावसात दादांचा सरकारवर हल्लाबोल !
भरपावसातही जनतेने हल्लाबोल आंदोलनाला दिला प्रतिसाद…
कुर्डुवाडी : वैराग येथील सभा आटोपून अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे कुर्डुवाडी येथील सभेला निघाले मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सभा होणार की नाही असे वाटत असतानाच अजित पवार यांनी भरपावसात कुर्डुवाडीच्या जनतेशी संवाद साधत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
वैरागची सभाल संपल्यावर आजच्या दिवसातील शेवटची सभा कुर्डुवाडी येथे होणार होती. या हल्लाबोलच्या जाहीर सभेला हजारोंच्या सख्येने जनसमुदाय दादा, तटकरे आणि मुंडेना ऐकण्यासाठी भर पावसात उभे होते. वैरागच्या सभेतच वेळ झाला असतानाही आणि पाऊस पडत असतानाही सभेला जमलेल्या कार्यकर्त्यांना नाराज न करता आपल्यासाठी थांबलेल्या जनसमुदायासाठी दादांनी भाषण केले. त्याअगोदर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पावसात भिजतच संवाद साधला.
पूर्वनियोजित जाहीर सभा असल्याने ही सभा होणारच होती परंतु या सभेपूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या सभेवर पाणी फिरते की काय असे सर्वांनाच वाटले होते. परंतु दादांनी आपल्यासाठी भरपावसात थांबलेल्या जनतेला निराश केले नाही. त्यांनी भरपावसात जनतेला संबोधित केलेच शिवाय सरकारच्या कारभारावर आसूढ ओढले.