भाजपचा ‘इतिहास’ शून्य असल्यामुळेच नागरिकशास्त्रात जाहिरातबाजी

भाजपचा ‘इतिहास’ शून्य असल्यामुळेच नागरिकशास्त्रात जाहिरातबाजी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे टीकास्त्र

मुंबई : राज्यातील शेतकरी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या करित असताना दहावीच्या विद्यार्थ्यांना नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून आपली महती सांगण्याची नैतिकता भाजपकडे आहे का, असा परखड सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील शेतकरी शंकर चायरे यांनी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकात सत्ताधारी पक्षांचे गुणगान प्रकाशित करण्याच्या संतप्त प्रकाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. शंकर चायरे यांच्या आत्महत्येबाबत बोलताना ते म्हणाले की, या शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा होता. त्यातच गेल्या वर्षी बोंडअळीने त्याचे कपाशीचे पीक उद्धस्त केले,चहोबाजूंनी आर्थिक संकटात फसलेल्या या शेतकऱ्याला सरकार भरीव दिलासा देऊ शकले नाही. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक घोषणा केल्या. परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही. त्यामुळे राज्यातील इतर लाखो शेतकऱ्यांप्रमाणेच शंकर चायरे हतबल झाले होते. अखेर थेट पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून त्यांनी आपली उद्विग्नता मांडली आणि मृत्युला कवटाळले. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक घोषणांनंतरही राज्यातील शेतकरी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या करत असल्याने सरकारचे शेतकरी धोरण फसल्याचे स्पष्ट होते. किमान या घटनेतून बोध घेऊन तरी सरकार सरसकट कर्जमाफी करणार का? कर्जमाफीची व्यापकता वाढवणार का? बोंडअळी, मावा, तुडतुडा,गारपीट, अवकाळी पाऊस आदी संकटांनी उध्द्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत करणार का ? असे अनेक प्रश्न विखे पाटील यांनी या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केले. विशेष म्हणजे केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना ‘ना भूतो ना भविष्यती’ अशी मदत करण्याची घोषणा पंतप्रधानांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभळी गावात केली होती; त्या दाभडी गावापासून शंकर चायरे यांचे राजूरवाडी हे गाव फारसे दूर नसल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी निदर्शनास आणून दिले.

दहावीच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात सत्ताधारी पक्षांचे गुणगान गाऊन विरोधी पक्षांची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रकाराबाबतही राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजप सरकारने आता आपल्या जाहिरातबाजीसाठी पाठ्यपुस्तकांचाही गैरवापर सुरू केल्याचे स्पष्ट होते. इतिहास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात गुणगान करण्यासारखी भारतीय जनता पक्षाची कोणतीही कामगिरी नाही. त्यांचा ना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे, ना स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीत योगदान आहे. स्वतःचा इतिहास शून्य असल्यामुळेच भाजपने आता नागरिक शास्त्राचा आधार घेऊन दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जनतेचे तुमच्या कार्यकर्तुत्त्वाबाबत सामान्यज्ञान इतके अद्यायावत आहे की असे कितीही उपद्व्याप केले तरी भारतीय जनता पक्षाला २०१९ मध्ये मतांचे अंकगणित बदलता येणार नाही, अशी बोचरी टीका करुन हा मजकूर तातडीने वगळण्याची मागणी त्यांनी केली.

Previous articleशिवाजी कर्डीलेंची भाजपातुन हकालपट्टी करण्याची शिवसेनेची मागणी
Next articleशिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा पक्ष असल्याने युती होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here