मुख्यमंत्री फितूर झाले तरी नाणार प्रकल्प होवू देणार नाही
उध्दव ठाकरेंचा इशारा
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाले असल्याची टिका करतानाच नाणार प्रकल्प लादणार नाही असे त्यांनी सांगितले असतानाही हा प्रकल्प लादला गेला. तरीही शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होवू देणार नाही असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.
काल दिल्लीत नाणार प्रकल्पाचा करार झाल्यानंतर या प्रकल्पाला विरोध करणा-या शिवसेनेकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. नाणार सारखा विनाशकारी प्रकल्प लादणार नाही स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कदापि कोकणाच्या भूमीत येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवूनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्वासघात असून, महाराष्ट्राच्या शब्दास दिल्लीत किंमत नसल्याची टिका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. स्थानिकांचा विरोध डालवून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होवू देणार नाही असे उध्दव ठाकरे यांनी सुनावले आहे. विकासाच्या नावाखाली कोकणचे वैभव मारू नका, कोकणातला आंबा, वने नष्ट होतील, निसर्ग मारून कोकणची राखरांगोळी करू नका, हे मुद्दे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडले असता ते त्यांनी मान्य केले असे सांगून, कोकणातील जनतेवर अन्याय होत असताना गप्प बसणार नाही असे त्यांनी दिल्लीस ठणकावून सांगायला हवे होते. परंतु मुख्यमंत्री फितूर झाले असले तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होवू देणार नाही असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला असल्याने हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.