शेतक-यांचे मंत्रालयाच्या दारात भाजीपाला फेकून आंदोलन
मुंबई : शेतीमालाला भाव मिळत नसल्याच्या आणि मुंबईतील कांदिवली परिसरात आठवडी बाजार भरवण्यास पालिका अधिकारी अटकाव करीत असल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या दारात भाजीपाला फेकून आंदोलन केले. कांदा, वांगी, बटाटा, मिरच्या, लिंबू मंत्रालयाच्या दारात फेकून आंदोलक शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मुंबईत शेतीमाल विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, कांदिवलीतील ठाकूर काॅम्प्लेक्स भागात मुंबई महानगरपालिके-या अधिका-यांनी त्यांना बसण्यास मनाई केली. परराज्यातून आलेल्या परप्रांतियांना महापालिकेचे अधिकारी मुंबईत कुठेही भाजीपाला विक्रीसाठी बसू देतात. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना बसू दिले जात नाही. उलट, या शेतकऱ्यांना कारागृहात डांबण्याची धमकी दिली जाते. याच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांनी गावाहून आणलेला शेतीमाल मंत्रालयाच्या दारात फेकून निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच तातडीने मंत्रालय प्रवेशद्वारापुढे स्वच्छताही करण्यात आली.