विदेशी दारू प्रमाणे देशी दारूही रंगीत असावी !
द डिस्टिलर्स असो.ऑफ महाराष्ट्रची मागणी
मुंबई : विदेशी दारू प्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा अशी मागणी द डिस्टिलर्स असो.ऑफ महाराष्ट्र या संघटनेने केली असून, देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविता येईल, असा दावाही या संघटनेच्या पदाधिका-यांनी केला आहे.
द डिस्टिलर्स असो.ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे पदाधिकारी आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आज बैठक पार पडली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.देशी दारूच्या रंगाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या देशी दारू पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार विदेशी दारूप्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा. देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले. यापुढे मद्य पॅकबंद बाटलीतच मिळावे, असे निर्देशही उत्पादन शुल्क मंत्र्यांकडून देण्यात आले. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करणाऱ्यांवरही नियंत्रण आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सीएल-३ देशी दारूच्या दुकानात यापूर्वी खुली दारू उपलब्ध होत होती. त्यामुळे खुलेआम दारूचे सेवन केले जाते. खुल्या दारूमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठ़ी सीएल-३ परवानाधारक दुकानात दारू पॅकबंद बाटलीत विकण्यात यावी. सीएल-३ व एफएल-२ ही दुकाने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतच सुरु राहतील असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे ऑनलाईनच देण्यात यावे असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.या विभागात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी इझी ऑफ डुइंग बिझनेस या सूत्राचा अवलंब केला जाणार आहे. याप्रसंगी असोसिएशनला उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामरक्षक दल गठित करणे व त्यास सहकार्य करण्याची सूचना केली. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल हा प्रभावी उपाय असून अवैध दारू निर्मिती कुठे होते याचा शोध घेऊन या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने ग्रामरक्षक दलास सहकार्य करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.