राज्यातील चार विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास तत्वतः मान्यता
मुंबई : महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. राज्यात अनेक ठिकाणी विमानतळ कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रशिक्षण संस्थांसाठी विचारणा होत आहे. शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरील पायाभूत सुविधांचा वापर या प्रशिक्षण संस्थांना देण्यासंदर्भात संचालक मंडळाने यावेळी मान्यता दिली. या संस्था खासगी सार्वजनिक सहभाग तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत.मिहान प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमार्फत प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार कंपन्यांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी येणार खर्च हा प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देश विदेशातील नवीन प्रकल्प मिहान मध्ये यावेत, यासाठीच्या प्राधिकरणाच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. चंद्रपूर येथील विमानतळाच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्याच्या प्रस्तावास तसेच राज्यात प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पुरंदर, अमरावती, कराड, सोलापूर, धुळे, फलटण येथील विमानतळ प्रकल्पांच्या विविध कामांनाही मान्यता देण्यात आली. शिर्डी येथील विमानतळ कार्यान्वित झाले आहे. या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले असून आवश्यक परवाने मिळाल्यानंतर लवकरच रात्रीच्या वेळीही विमान उतरण्यास सुरुवात होईल, असे यावेळी सांगण्यात आले. मिहान विमानतळास मोठा प्रतिसाद मिळत असून सन २०१७-१८ या वर्षात १५ कोटींचा फायदा झाला आहे. तर पुढील सन २०१८-१९ या वर्षात सुमारे २८ ते ३० कोटींचा फायदा होईल, अशी माहिती काकाणी यांनी यावेळी दिली.