मुख्यमंत्र्यांच्या हागणदारीमुक्त महाराष्ट्रावर राष्ट्रवादीचे प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांच्या हागणदारीमुक्त महाराष्ट्रावर राष्ट्रवादीचे प्रश्नचिन्ह

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महारष्ट्र हागणदारीमुक्तच्या घोषणेवर राष्ट्रवादीने प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यासाठी ४ हजार ७१ कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र ही सत्य  परिस्थिती नसल्याचे सांगतानाच सरकारने महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला याची कोणत्या पातळीवर तपासणी केली  असा थेट सवाल  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग अद्याप अस्वच्छच असून, सरकारने जनतेसमोर सत्यता ठेवून जनऑडिटची योजना जाहीर करावी असे खुले आव्हान  त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. यासाठी सरकारने ४ हजार ७१ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ही मोठी घोषणा करत असताना जाहिरातबाजीही करण्यात आली. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना निर्मल भारत योजना आणण्यात येवून रााज्यात माजी ग्रामविकासमंत्री आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात आले.मात्र सध्याचे युती सरकार केवळ दिखावा करत आहे असा आरोप मलिक यांनी केला.मुंबईची जबाबदारी आमच्याकडे नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले. या कार्यक्रमाला अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित होते. मात्र अक्षय कुमार यांच्याच पत्नीने मध्यंतरी मुंबईतील अस्वच्छतेबाबात ट्वीट करत विरोधाभास दाखवून दिला होता असेही मलिक यांनी सांगितले.हागणदारीमुक्तची सत्यता पडताळणीसाठी आम्ही मुंबईत प्रभात फेरीचे आयोजन करू,गाडया,जागाची निवड आम्ही करू, मुख्यमंत्र्यांनी या फेरीत सहभाग घ्यावा. मुंबई शहर हागणदारीमुक्त झाले की नाही ते आम्ही दाखवून देवू असे आव्हान देतानाच मुख्यमंत्र्यांनी  फक्त हा आकडेवारीचा खेळ केला आहे असाही आरोप मलिक यांनी केला. महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला नसून, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग अद्याप अस्वच्छच आहेत. सरकारने जनतेसमोर सत्यता ठेवावी आणि जनऑडिटची योजना जाहीर करावी असे खुले आव्हान  मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

अहमदनगर दुहेरी हत्याकांडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या वडिलांना मुद्दाम गोवण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास गिरवले यांना ८ एप्रिलला अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडी देण्यात येवून त्यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ते तीन दिवस पोलिस कोठडीत होते. त्यांना न्यायालयासमोर हजर न करता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यु झाला असे पोलीस सांगत आहेत मात्र पोलिस दिशाभूल करत आहेत. गिरवले यांचा मृत्यु पोलिस कोठडीतच झाला असून, त्यांना पोलिस कोठडीतच मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण झाल्यामुळे दुखापत होवून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये पोलीस निरिक्षक दिलीप पवार, देवीदास कर्डीले, गुट्टे आणि शिपाई काळे हे गिरवले यांच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांना तात्काळ निलंबित करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी मलिक यांनी यावेळी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल असा इशाराही मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या दबावाखाली ही हत्या झाली आहे. त्यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर कारवाई झाली नाही. दिपक केसरकर यांच्याकडून नगर जिल्हयाची जबाबदारी काढून घेण्यात यावी अशी मागणीही  मलिक यांनी केली.

देशात न्याय मिळतोय ही स्थिती आता देशात राहिली नाही. दिवंगत न्यायमूर्ती लोया यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शवविच्छेदन अहवालावर देण्यात आला आहे.नागपूर वैद्यकिय महाविद्यालयात ज्यांच्या अधिकारात शवविच्छेदन अहवाल तयार केला ते डॉ. व्यवहारे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. २०१५ मध्ये शवविच्छेदन अहवाल बदलतात असा आरोप व्यवहारे यांच्यावर त्यांच्याच विदयार्थ्यांनी केला होता. २०१४ मध्येही त्यांनी अहवाल बदलला नसेल हे कशावरुन ठरवायचे. त्यामुळे डॉ.व्यवहारे यांची नार्को टेस्ट करावी त्यात सत्य समोर येईल अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक या दर तीन वर्षाने होत असते. जिल्हा कार्यकारिणीच्या निवडणूकांबाबत २२ एप्रिल रोजी बैठक पार पडेल. राज्य पातळीची तसेच अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत येत्या २९ एप्रिल रोजी पुणे येथे बैठक होईल. १३ मे रोजी निवडणूकांचा निकाल जाहीर होणार असल्याची माहितीही मलिक यांनी दिली.

Previous articleकाँग्रेस व गांधी-नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणार्‍या युट्यूब चॅनेल विरोधात गुन्हा दाखल
Next articleफडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here