मुख्यमंत्र्यांवरील पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित मॅन ऑन मिशन महाराष्ट्र या पुस्तकाचे प्रकाशन येत्या केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.पुण्यातील पत्रकार आशिष चांदोरकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, औरंगाबाद येथील साकेत प्रकाशनने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. मंगळवार दिनांक २४ एप्रिल रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडे तीन वाजता पार पडणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीत भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने कायमच प्रथम क्रमांकावर राहिली, याचे विश्लेषण पुस्तकामध्ये आहे. फडणवीस सरकारच्या विविध योजना आणि निर्णयाचा सामान्य नागरिकांना, कुटुंबांना तसेच समुदायांना कसा फायदा झाला आणि त्यांचे जीवनमान कशा पद्धतीने सुधारले, या संदर्भातील यशोगाथांचा पुस्तकात समावेश आहे. राज्याच्या वीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाच हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून, विविध समाजघटकांशी बोलून आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत या पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे.
जलयुक्त शिवारचे अफाट यश, मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी होणारी मदत, मिरज ते लातूर जलदूत एक्स्प्रेसची यशोगाथा, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रांच्या सततच्या प्रयत्नातून नागपुरात साकारण्यात येत असलेल्या ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची कहाणी, केळीच्या झाडाच्या खोडांपासून विविध उत्पादनांची निर्मिती करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या ताप्तीची वाटचाल आणि राज्यातील इतर ठिकाणच्या सक्सेस स्टोरीजचा यात समावेश करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांमुळे राज्याचा विकास कसा वेगाने होतो आहे, केंद्राच्या विविध योजनांचा फायदा घेण्यात महाराष्ट्र कसा अग्रेसर आहे, शेतीसह पायाभूत सुविधा निर्मितीत महाराष्ट्राने कशी बाजी मारली आहे, याचा उहापोह पुस्तकात करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पक्षाचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी यांचेही मनोगत पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहे.