नाणार विदर्भात गेल्यास नागपूर अधिवेशनासाठी शिवसेना पुढाकार घेणार !

नाणार विदर्भात गेल्यास नागपूर अधिवेशनासाठी शिवसेना पुढाकार घेणार !

मुंबई : जर मुख्यमंत्री नाणार तेल शुध्दीकरण प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ ,नाणार प्रकल्प कोकणात होत नाही तर तो आम्ही घालवला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटले.

भाजपचे नाराज आमदार आणि नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी करणारे आशिष देशमुख यांनी सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.या दोघांमध्ये नाणार प्रकल्पासंदर्भात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. नाणार प्रकल्पाची खरी गरज विदर्भाला असल्याचेही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. नाणार प्रकल्प विदर्भात व्हावा, हा आ. आशिष देशमुख यांचा प्रस्ताव अभ्यासपूर्ण असल्याचे सांगून उध्दव ठाकरे यांनी त्यांचे कौतुकही केले. या प्रकल्पामुळे एक लाख रोजगार निर्मिती होणार असल्याने विदर्भाला त्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. निर्णयाविना होणारे अधिवेशन नागपूर मध्ये घेऊन काही होणार नाही, चांगले निर्णय मुंबईत बसून घेतले जाऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.

जर मुख्यमंत्री नाणार तेल शुध्दीकरण प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ असेही उध्दव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. नाणार प्रकल्प गुजरातला जाण्याची भिती दाखवली जात होती. कोकणात नाही तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प घेवून जावा असे सांगतानाच एक सारखी गुजरातची भीती दाखवू नये असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. नाणार अधिसूचना रद्द करण्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता.कायदे हे जनतेसाठी आहे जनता कायद्यासाठी नाही आणि आम्ही जनतेसोबत आहोत असेही ते म्हणाले.

Previous articleएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द
Next articleनाशिक विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here