जादा भाडे आकारल्यास खासगी वाहनाचा परवाना रद्द करणार

जादा भाडे आकारल्यास खासगी वाहनाचा परवाना रद्द करणार

मुंबई :  गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात अवाजवी वाढ करण्यावर राज्य सरकारने आजपासून लगाम घातला आहे .उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून,या भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनांचे परवाने  मोटार वाहन कायदा नियमाप्रमाणे रद्द करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे .

राज्यात प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी बस,ट्रॅव्हल्स इत्यादी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीच्या हंगामामध्ये (उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, गणेशोत्सव, होळी,नाताळ सुट्टी इत्यादी काळामध्ये) या वाहतुकदारांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे या वाहनांचे भाडे दर निश्चित करण्याचे आदेश  उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिले होते. त्यानुसार हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुणे येथील केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी सुविधांचा अभ्यास करुन अहवाल सादर केला.या वाहनांची वर्गवारी प्रमुख्याने वातानुकूलीत (एसी), अवातानुकूलीत (नॉन एसी), शयनशान (स्लिपर), आसन व्यस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लिपर) इत्यादी प्रकारात करण्यात आली आहे.

या खासगी वाहनांना एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. एसटी बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडे दर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडे दर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खासगी वाहनांना प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीटदर आकारणे बंधनकारक राहील, असे मंत्री रावते  यांनी सांगितले. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात उद्यापासून सलग चार दिवस सुट्टी असल्याने खासगी कंत्राटी वाहनांनी आज रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या मार्गासाठी एरवी साधारण ५०० रुपये तिकीटदर आकारला जातो, त्या मार्गावर आज रात्री प्रवासासाठी साधारण २ हजार रुपये तिकीटदर आकारला जात आहे. खासगी वाहनांची ही मनमानी आणि प्रवाशांची अडवणूक रोखण्याच्या दृष्टीने आजचा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे रावते यांनी  सांगितले.

Previous articleमाधव भांडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा
Next articleशासनाच्या मासिकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here