गांधीजींच्या विचारांचे महत्व कमी करण्याचा सरकारचा घाट ?

ग्रामसभांच्या आयोजनाच्या तारखात सरकारकडून बदल महात्मा गांधी जयंती वगळली तर राष्ट्रीय दिवसांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न

गांधीजींच्या विचारांचे महत्व कमी करण्याचा सरकारचा घाट? – धनंजय मुंडेंची सरकारच्या निर्णयावर टीका

मुंबई  : “राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा सरकारचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे, असे मत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त करत सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या दिवशी ग्रामसभा आयोजित केली जाते. त्यात महाराष्ट्र दिन (१ मे), स्वातंत्र दिन (१५ ऑगस्ट), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) या दिवसांचा समावेश आहे. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या ( २७ एप्रिल ) शासन निर्णया नुसार २६ जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या दिवसांचा उल्लेख ग्रामसभा भरवण्याच्या दिवसांत नाही तर मे, ऑगस्ट व नोव्हेंबर महीण्यांचा उल्लेख आहे. २ ऑक्टोबर या महात्मा गांधी यांच्या जयंतीला वगळून त्या एवजी नोव्हेंबर महिन्याचा उल्लेख आहे. या निर्णयाने राष्ट्रासाठी विशेष असलेल्या दिवसांचे सरकार महत्व कमी करत असल्याचे स्पष्ट होते.

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतूदीनुसार चार ग्रामसभांव्यतिरीक्त इतर फ्लॅगशिप कार्यक्रमांमुळे वर्षभरात ग्रामसभंची सरासरी संख्या वाढत आहे. यामुळे ग्रामसेवकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याचे कारण पुढे करत ग्रामसभांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण देत शासनाने घेतलेला निर्णय हा लोकशाहीच्या विरोधात आहे.

ग्रामसभा हा लोकशाहीचा कणा आहे. नागरिकांना आपली मतं मांडण्याचा, तसेच विविध योजनांची माहिती घेण्याचा हक्क या मार्फत प्राप्त होतो. देशाचे प्रेरणास्थान असलेले महात्मा गांधी यांची जयंती, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन या विशेष दिनांचा सरकारला विसर पडत चालला आहे. दिवसेंदिवस हे सरकार हुकूमशाहीकडे कलताना दिसत आहे. आपली लोकशाही अबाधित राहावी यासाठी या सरकारला हद्दपार करणे गरजेचे असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Previous articleशासनाच्या मासिकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान
Next articleसुप्रियाताईंच्या ट्विटमुळे माझा राजकीय भाव वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here