दोन्ही कॅांग्रेस एकत्र निवडणूका लढविणार

दोन्ही कॅांग्रेस एकत्र निवडणूका लढविणार

शरद पवार

मुंबई :  काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नसून, मुंबईमध्ये दोन्ही कॅांग्रेस एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.आज वेगळया कामासाठी एकत्र येण्याचे ठरवले होते. परंतु मुंबई अध्यक्ष निवड करताना जिल्हया-जिल्हयाचे मत ऐकून घ्यावे असे मत समोर आले. त्यामुळे त्या निर्णयानुसार निवड होणार आहे.आज छगन भुजबळ असते तर मला आनंद झाला असता. मात्र ते बाहेर आले त्याचे समाधान नक्कीच आहे. ते बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या बाबतीत अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही यश मिळेल अशी आशा  पवार यांनी व्यक्त केली.

निवडणूका जवळ आल्याने संघटनेला व्यवस्थित चेहरा द्यायचा आहे. यश-अपयश येतच असते. परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते ती बांधिलकी तुम्ही ठेवली आहे असेही  पवार म्हणाले.जुन्या लोकांना बरोबर घेवून नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी. अधिक उत्साहाने काम करणारे व लोकांनी पसंद केलेले सर्व घटकातील लोक पुढे आणण्याची गरज असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.मुंबई ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. एक कामगारांची सामुहिक शक्ती पाहायला मिळत होती. गिरणगाव हे गिरणगाव आज राहिलेले नाही. वेगळया विचारांचा कामगार आज आला आहे. त्यामध्ये व्हाईट कॉलर कामगारांचा समावेश आहे. विशेष करुन त्यामध्ये शासकीय कामगार, अनेक संस्थामध्ये काम करणारा कामगार आहे. यांची संख्या व शक्ती वाढलीय त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचे आवाहन करतानाच सामुहिक संघटन उभे करण्याची गरज आहे. मध्यमवर्ग हा मते तयार करतो. त्यांच्याशी संपर्क कसा वाढेल याची काळजी घ्यायला हवी असे मार्गदर्शनही  पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

Previous articleशिवसेनेचा  विश्वजित कदम यांना पाठिंबा
Next articleराज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here