अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाही, शिवनेरीमधून मोफत प्रवास
परिवहन मंत्री दिवाकर रावते
मुंबई : राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवशाही, शिवनेरी तसेच इतर आरामदायी गाड्यांमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यास आज परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, अशी माहिती मंत्री रावते यांनी दिली.
रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, संचालक शिवाजी मानकर, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, समितीचे सदस्य योगेश त्रिवेदी उपस्थित होते.सध्या एसटीच्या साध्या गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत आहे. ही सवलत अन्य आरामदायी गाड्यांनाही लागू करावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे यापूर्वी केली होती तसेच ही सवलत लागू करावी म्हणून पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
रावते म्हणाले की, एसटीच्या शिवशाही,शिवनेरीसह इतर सर्व अत्याधुनिक आणि आरामदायी गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत देण्याबाबत एसटी महामंडळ पूर्ण सकारात्मक आहे. याबाबत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या तसेच संभाव्य खर्चाची माहीती एसटी महामंडळास सादर करावी. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर प्रस्ताव सादर करुन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही सवलत योजना तातडीने लागू केली जाईल, असे ते म्हणाले.
एसटी महामंडळामार्फत विविध घटकांना प्रवास सवलत योजना राबविण्यात येतात. या विविध सवलत योजनांचा संपूर्ण खर्च आता परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. सर्व विभागांच्या सवलत योजनेचे दायित्व आता परिवहन विभाग स्वीकारणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय अंमलात येईल. पत्रकारांसाठीच्या सवलत योजनेचा खर्च आतापर्यंत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत होता. पण आता हा खर्चही परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. परिवहन विभाग हा पत्रकारांच्या सवलतीची व्याप्ती वाढविण्याबाबत पूर्ण सकारात्मक आहे, असे ते म्हणाले.