मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ
मुंबई : देशात प्रथमच शुभारंभ करण्यात आलेली मुंबई मोनो रेल्वेचा टप्पा एक आणि टप्पा दोन यासाठी २ हजार ४६० कोटीचा खर्च अपेक्षित होता मात्र आता या खर्चात २३६ कोटींची वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने दिलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासाठी अपेक्षित असलेला खर्च आणि वाढीव खर्चाची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाचे जन माहिती अधिकारी तरुवर बॅनर्जी यांनी अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत, मोनोरेल टप्पा १ आणि मोनोरेल टप्पा २ यासाठी अपेक्षित एकूण खर्च २ हजार ४६० कोटी (कर वगळता) आहे. सद्यस्थितीतील एकूण खर्च २ हजार १३६ करण्यात आला आहे. मोनोरेल टप्पा १ आणि मोनोरेल टप्पा २ यासाठी एकूण अपेक्षित वाढीव खर्च २३६ कोटी इतका आहे. चेंबूर ते वडाळा डेपो या पहिल्या टप्प्यातील असलेले ७ मोनोरेल स्टेशन असून पहिल्या टप्प्याची एकूण लांबी ८.८० किलोमीटर आहे यात चेंबूर, व्ही एन पुरव मार्ग आणि आर सी मार्ग जंक्शन, फर्टलाईजर टाऊनशीप, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क आणि वडाळा डेपो ही स्टेशन आहेत. संत गाडगे महाराज चौक ते वडाळा डेपो या दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परेल, मिंट कॉलनी, आंबडेकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा ब्रिज, आचार्य अत्रे नगर, अंटाप हिल आणि जीटीबी नगर अशी १० मोनोरेल स्टेशन आहेत. या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची एकूण लांबी ११.२० किलोमीटर इतकी आहे.मोनोरेल टप्पा १ आणि मोनोरेल टप्पा २ या प्रकल्पाच्या वाढीव २३६ कोटींच्या खर्चास एमएमआरडीए प्राधिकरण समिती, कार्यकारी समिती आणि महानगर आयुक्त यांची मान्यता आहे तसेच शासनाची मान्यता मिळाली आहे, असे माहितीत कळविण्यात आले आहे.