मुख्यमंत्र्यांनी हातात पाटी व खोरे घेवून केले श्रमदान

मुख्यमंत्र्यांनी हातात पाटी व खोरे घेवून केले श्रमदान

सांगली : तीन वर्षापूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होवू लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होवू शकते, याचा प्रत्यय मला बागलवाडीत आला. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होवू लागले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी नंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हातात पाटी व खोरे घेवून श्रमदान केले. त्यांना आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, शांतीलाल मुथा यांच्यासह अन्य मान्यवरांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे श्रमदान करणाऱ्या नागरिकानांही प्रेरणा मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखाद्या योजनेला जनतेची साथ मिळत नाही, ती योजना जनतेची होत नाही, तोपर्यंत ही यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजनेला जनतेची साथ मिळावी, लोकसहभाग वाढावा, योजना लोकांना आपलीशी वाटावी, अशी योजना आखली. या योजनेला अमीर खान यांच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेची साथ मिळाली.  या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचा एकच ध्यास घेवून श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला, याच धर्तीवर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून काम करीत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन-साडेतीन वर्षापूर्वी राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणं आवश्यक आहेतच, पण त्याचबरोबर विकेंद्रित पध्दतीने पाणलोटाचे स्त्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीज राज्यातील जवळपास २० हजार गावे दुष्काळमुक्त  झालेली असतील, असा विश्वास व्यक्त करून याचे श्रेय जनसहभागाला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बागलवाडीच्या ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले व दुष्काळाला पराभूत केले. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहे, असे स्पष्ट करून त्यांनी बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्नशील असून जलसंधारणाच्या कामासाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Previous articleरामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Next articleकर्नाटकच्‍या राज्‍यपालांना तातडीने पदमुक्‍त करा! : विखे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here