शेवटच्या शेतक-याची तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू ठेवा
धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड : राज्यातील हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदी अभावी तुर खरेदी केंद्रावर पडून असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे तुर खरेदी योजनेस मुदतवाढ देऊन शेवटच्या शेतकऱ्याची तुर खरेदी होत नाही तोपर्यंत हे तूर खरेदी केंद्र ठेवण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे.
राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १८ एप्रिल पर्यंत तुर खरेदी मुदत होती परंतु मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधीनी आणि शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळे ही मुदत १५ मे पर्यंत वाढविण्यात आली. मात्र वाढीव मुदतीत बारदान्याचा तुटवडा, तूर साठवण्यासाठी गोदामांची अनुपलब्धता यासारख्या अडचणींमुळे तुर खरेदी होऊ शकली नाही . परिणामी अनेक जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर खरेदी अभावी आजही खरेदी केंद्रांवर तशीच पडून आहे.
राज्यशासनाने तुर खरेदी केल्यानंतर कदाचित बाजारातील भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र बाजारपेठेतील तूरीचे भाव वाढलेले नाहीत त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रा शिवाय पर्याय राहिला नाही.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी शासनाने दिलेल्या मुदतीत मोजमाप होऊ न शकल्यामुळे अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करून शेवटच्या शेतकऱ्याची तूर खरेदी होत नाही तोपर्यंत शासनाने या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा आणि शेवटच्या शेतकऱ्याची तुर खरेदी होत नाही तोपर्यंत हे केंद्र सुरूच ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी या पत्रामध्ये केली आहे.