सुट्टीच्या दिवशी भाजपने साधला थेट मतदारांशी संपर्क

सुट्टीच्या दिवशी भाजपने साधला थेट मतदारांशी संपर्क

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानापुर्वीचा शेवटचा रविवार भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने मतदारांशी थेट संवाद साधणे शक्य होते. मात्र येत्या २८ मे रोजी मतदान असल्याने त्यापुर्वीचे दोन दिवस प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे पुढील रविवारी प्रचार करणे शक्य नसल्याने याच रविवारी भाजपने मतदारांच्या थेट भेटीगाठींवर भर दिला.

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने भाजपने मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र भाजप कार्यकर्त्यांची फौज मतदारांच्या थेट संपर्कात राहून मतदारसंघातील वातावरण भाजपमय करण्यासाठी कामाला लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत मोटारसायकलींवर भाजपचे झेंडे लावून रस्त्यांवरून फिरणारी तरुणाई अधिक प्रमाणात दिसली. सुट्टी असल्याने युवक आणि महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते. रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता, तर दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हा चारनंतर प्रचाराने उसळी घेतली. जिल्ह्यातील विविध शहरातील उच्चभ्रू वसाहतीप्रमाणेच झोपडपट्ट्या, सोसायट्या अशा सर्वच भागात जास्तीत जास्त संख्येने पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. कामगार, व्यापारी, कष्टकरी, मुस्लीम, दलित अशी संमिश्र लोकसंख्या असलेल्या भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार करत होते. याशिवाय घरोघरी जाऊन मतदारांना भाजपने पालघर जिल्ह्यासाठी तयार केलेल्या नियोजित विकास आराखड्याची माहिती देत होते. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वॅाट्सअॅप, आणि ट्वीटरसारख्या समाजमाध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचार नियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

Previous articleलुटलेले हजारो कोटी वापरा आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा!
Next articleसेवा हक्क कायदा आता एमएमआरडीए प्राधिकरणास सुद्धा लागू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here