गोपीनाथ गडावर उद्या जनसागर उसळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय मंत्री उमा भारती, खा. उदयनराजे, खा. संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती
विविध सामाजिक उपक्रमांसह कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव
बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त उद्या गोपीनाथ गडावर मोठा जनसागर उसळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय मंत्री उमा भारती, ना. चंद्रकांत पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. संभाजीराजे भोसले यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी केले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा चौथा स्मृतिदिन उद्या ३ जून रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह गोपीनाथ गडावर होणार आहे. सकाळी १० वा. प्रसिद्ध रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक महाराज यांचे कीर्तन होणार असून कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. लोकनेते मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातुन लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याने तशी तयारी करण्यात आली आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे उद्या दुपारी हेलिकाॅप्टरने आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे व खा. संभाजीराजे हे दोघेही तसेच अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव
याप्रसंगी कुस्तीपटू राहूल आवारे ( पाटोदा) महिला क्रिकेटर कविता पाटील (केज) संतोष गर्जे (गेवराई) व ऊसतोड मजूरांचे श्रम कमी व्हावे म्हणून मशिनरीची निर्मिती करणारे गुरूलिंग स्वामी यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे.
परळी तालुक्यातील महिला स्वंय सहायता गटांना खवा निर्मितीच्या मशिनचे वितरण करण्यात येणार आहेत. स्वंयसहायता बचत गटातील बंजारा समाजातील महिलांनी कलाकुसर वापरून उत्पादित केलेल्या ज्युट बँग आणि इतर वस्तूंच्या स्टाँलचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे.
पंकजा मुंडे यांनी घेतला तयारीचा आढावा
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गड येथे जावून पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना केल्या. उद्याचा कार्यक्रम अतिशय शिस्तीत व नियोजन बध्द रितीने पार पडावा तसेच महाप्रसादाचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.