आरोग्यमंत्री दीपक सावंतांचा पत्ता कट, विलास पोतनीसांना उमेदवारी
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून शिवसेनेने आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारली असून, विभाग क्रमांक एकचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी येत्या २५ जून रोजी निवडणूक होत असून, शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे राज्याचे आरोग्यमंत्री डॅा. दीपक सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विभाग प्रमुख विलास पोतनीस यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. विलास पोतनीस हे विभाग क्रमांक एक म्हणजेच बोरीवली, दहिसर आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत विलास पोतनीस यांनी महत्वाची भूमिका पार पाडल्याने त्यांना या निवडणूकीत संधी देण्यात आली आहे.आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सध्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते गेल्या दोन टर्म विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.