आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.
शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावंत यांना उद्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर रहायला सांगितले आहे. आज शिवसेनेने पदवीधर मतदार संघासाठी विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली.त्यानंतर डाॅ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
मुंबई पदवीधर मतदार संघातून डाॅ.सावंत यांना डावलून शिवसेनेने विभागप्रमुख विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवा सेनेमध्ये आणि पदवीधर मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. सावंतांना परत उमेदवारी दिली गेल्यास त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला असता त्यामुळेच सावंतांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.