भाजपाध्यक्ष अमित शहा “मातोश्री”वर !
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीसाठी शिवसेनेपुढे प्रस्ताव ठेवला तर पालघर लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेने स्वबळावर लढत आपली ताकद दाखवून दिल्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या बुधवारी संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत आगामी लोकसभा युती करून लढविण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासुन त्यांनी अनेक वेळा मुंबईत येऊनही “मातोश्री” भेट टाळली आहे. परंतु शिवसेनेने घेतलेली टोकाची भूमिका पाहता खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह मातोश्री भेटीवर जात असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान,पालघर पोटनिवडणूकीत शिवसेनेने ताकद दाखवल्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहांना मातोश्रीवर यावसे वाटतय, अशी प्रतिक्रिया शिवसेना खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. गेली चार वर्षे केंद्रात सत्ता असताना त्यांना मातोश्रीवर यावस वाटले नाही.परंतु अनेक मित्रपक्षांनी भाजपाची साथ सोडण्यास सुरूवात केल्याने देशातील राजकीय चित्र बदलू लागले आहे.पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने ताकद दाखवल्याने आता चार वर्षांनी शाह यांना मातोश्रीवर यावंस वाटतय, असे राऊत म्हणाले.